तुला माहिती आहे का ..? मला ना हल्ली तुझ्यासोबत वेळ घालवायला फार आवडत. हा म्हणजे तसा तु मला पाहिलेपासूनच आवडायाचा पण हल्ली थोडा जास्तच. आपलं नात काय आहे माहिती नाही पण तु कायम हवाहवासा वाटतो.
तुझ्या जवळ मला एक वेगळीच शांतता मिळते आणि मुक्याने होणारा संवाद किती प्रभावी असतो हे तूच मला शिकवले. तुला खरं सांगु का..? पूर्वी ना मला मंदिरात अशी शांतता मिळायची. पण हल्ली मी जाणं कमी केलंय ह्याचा अर्थ हल्ली मी नास्तिक झाले असा अजिबात काढायचा नाही हं! अजुनही माझा त्याच्यावर तितकाच विश्वास आहे. पण सध्या मी त्याला ठराविक मूर्तीत पाहणं बंद केलंय इतकंच!. त्याचं अस्तित्व हल्ली मी त्या देवळाच्या भिंतींच्या पलीकडे जाऊन शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आणि असंच शोधता शोधता तुझ्याजवळ आले. तशी आपली ओळख जुनीच पण आता मी तुला जवळुन ओळखण्याचा प्रयत्न केला. आणि कमाल!अगदी मंदिरातील शांतता मला तुझ्याजवळ मिळाली. म्हणजे तो खरा की तु..? हा प्रश्नच मला पडला. खरं तर तु ही आम्हाला भरभरून देत असतो पण तुझ्याकडे कधी हात पसरवून मागतांना मी कधी कुणाला बघितलं नाही. शेवटी मूर्तीतच देव बघणारे आम्ही सोड,!तसा तुझा रागही भयंकरच बाबा! भल्याभल्यांना नष्ट केलं तु. तरीही लोक सुधारत नाहीत. जाऊ दे, लोकांचा विषय आपल्यामध्ये नकोच.
तुला माहिती आहे का ..? मला ना तो घंटा नादाचा ध्वनी खुप आवडतो. अगदी ऐकत राहावं असं माधुर्य असतं त्या आवाजात. पण त्याच बरोबर आता मला तुझ्या सानिध्यात असताना तुझेही वेगवेगळे आवाजही फार सुखावून जातात.
खरं तर तु माझा कोण ...? कधी कधी तु मला तुझ्या बाबांसारखा वाटतो, म्हणुन तर तुझी भीतीही वाटते. कधी कधी भावांसारखा जो त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही. पण खरं सांगु का तु माझा नेहमीच जवळचा असणारा एक मित्र . अगदी कितीही मूड खराब असला की, तुझ्याजवळ यावं आणि व्यक्त व्हावं असा तु. खऱ्या अर्थाने तु माझा मितवा आहेस. मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या. तुझं प्रत्येक रूप मग ते निळेशार आभाळ असो, हिरवे डोंगर असो किंवा खळखळणारा झरा प्रत्येक रुपात तु तितकाच आवडतो. तुझं प्रत्येक रूप काहीतरी शिकवून जातं. आणि म्हणुन तु कधी गुरुही वाटतो. पण आपलं मैत्रीचं नातंच खुप छान आहे. तेच जपुया . चल आता निरोप घेते, अजुन खुप शिकायचं आहे तुझ्याकडुन. आणि काळजी घे आमची.
©Neha R Dhole.
Comments
Appreciate the author by telling what you feel about the post 💓
No comments yet.
Be the first to express what you feel 🥰.
Please Login or Create a free account to comment.